Ras Grahan

*"जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतिल , चंद्र झळकतिल ,
तारे अपुला क्रम आचरतिल ,
असेच वारे पुढे वाहतिल ,
होईल काहि का अंतराय ?मेघ वर्षतिल , शेते पिकतिल ,
गर्वाने या नद्या वाहतिल ,
कुणा काळजी की न उमटतिल ,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतिल ,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल ,
उठतिल , बसतिल , हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?
रामकृष्णही आले , गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?"*
जगाच्या उत्पत्तीपासून चालू असलेल्या या जगराहटीचं यथार्थ आणि समग्र वर्णन भा.रां. नी या कवितेत केलेलं आहे .
सर्वप्रथम या कल्पकतेला सलाम
मानवी स्वभावानुसार प्रत्येकजण पोटापाण्यासाठी आपली दिनचर्या अपरिहार्यपणे करतच असतो .
त्याच प्रमाणे निसर्गही वेळेनुसार मानवाच्या कल्याणासाठी आणि काळजी मिटविण्यासाठी ऋतू बदलत असतो .
आपल्या मरणानंतर आपले सख्खे संबंधीही आपली कामे-कर्तव्ये करून कार्यरत रहातील . माझ्या नसण्याने त्यांना काहीच फरक पडणार नाही .
देव-दूतही येऊन गेले . जनमानसांत त्याचा काहीच परिणाम झाला नाही .
असं असल्यानं प्रत्येकाने जगाच्या आणि परमेश्वराच्या मोहात न पडता आणि परिस्थितीला सामोरं जाऊन , आपलं कार्य शांतपणे चालू ठेवणं हेच हितकरक आहे .
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! .
Contributor: Kishore Joshi
कविते बद्दल :राजकवी नी 'जन पळभर' हि कविता अजमेर, येथे १८.०८.१९२१ रोजी लिहीली(सं.तांबे यांची समग्र कविता) त्याना संगीताचे गाढे ञान होते. ही कविता 'जात नववधू राग तोडी' साठी आधारली असल्याचे नमूद केले आहे. रसग्रहणा चा आनंद घ्या.

*"कळा ज्या लागल्या जीवा , मला की ईश्वरा ठाव्या".....*
कवी भा. रा. तांबेंनी आपले विचार कवितेतून मांडले आहेत . असह्य दुःख झालेल्या जीवनांतली व्याकुळ अवस्था कुणाला सांगणार ?
जवळचं कोणाला म्हणावं ह्या विचाराने मन अस्वस्थ झालेलं असताना ते म्हणतात
" समुद्री चौहुकडे पाणी , पिण्याला थेंबही नाही ."
श्रीमंती असूनही नसल्यासारखी !
आजुबाजूला गर्दी असतानाही माझं कोणीच नाही हे सांगताना भा.रा. म्हणतात
" जनांच्या कोरड्या गप्पा , असेच सारे जगद्बंधू " .
मनाची अत्यंत आर्त अवस्था अतिशय साध्या पण परिणामकारक शब्दांत यापेक्षा कशी मांडतां येईल ?
संगीतकार वसंत प्रभूंची अतिशय समृध्द अशी रचना . कविता म्हणून , या गाण्याचा दर्जा निश्चितच आहे .
पण गाण्याची चाल म्हणून देखील या रचनेचा अभ्यास व्हावा . गायकी ढंगाची चाल आहे आणि गाणे ऐकताना त्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात .
लताबाईंनी गाताना , शब्दांचं औचित्य ज्या प्रकारे सांभाळले आहे , तो भाग तर केवळ प्रशंसनीय आहे .
वास्तविक , कुठलीही संगीतरचना एका ठराविक मर्यादेपर्यंत 'बिनतोड' किंवा 'निर्दोष ' होऊ शकते .
परंतु जर का हा एक मानदंड मानला तर या निकषाच्या जवळपास जाण्याची या गाण्याची योग्यता नक्कीच आहे .
*या त्रिमूर्तींनी या कवितेला गाण्याच्या उच्च पातळीला नेलं आहे हेच खरं !*
Credit : श्री किशोर जोशी , पुणे | BE (Mech), DMS
Mob. No.: 77200 92620
व्यवसायाने ने मैकेनिकल इंजीनियर, पण कलेची आवड. वाचन, संगीत आणि त्यावर रसग्रहण लिहिणे हा आवडता छंद.