Skip to main content

Athvanitil gani

Rajkavi Bhaskarrao Ramchandra Tambe

Memorable songs


तिनिसांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला.

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा,
चक्रवाल हें पवित्र, ये जी शांत गभीर निशा,
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा-
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला.

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत,
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत,
पाणि जसें मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत,
हृदयीं मी सांठवीं तुज तसा जीवित जों मजला.

अनंता, तुझे गोल, तारे तुझे,
तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें,
तुझीं ही कृती रे मनोमोहना,
अहोरात्र गाई तुझ्या गायना.

तया मूक गानें मना मोहिलें,
जगन्‍नायका, वेड कीं लाविलें;
नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें;
भरूं लागलो सूर वेडे खुळे.

मदी त्या तुझें रूप गाऊं धजें,
स्वयंदीपका दीप दावूं सजें;
न द्यावा जिथे पाय तेथे दिला,
बहू लाजलों भान येतां मला

तुझे लाडके रे, तुझे लाल जे
वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजें;
करोनी दया रे दयासागरा,
क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा.

अहो भाग्य माझें जरी या सुरीं
सहस्रांश त्या गीतिची माधुरीं !
तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी !
रुचो हें तुला स्तोत्र, घे आवरीं.

कशी काळनागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी !
प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधी.

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी.
सुखी पाखरें गात चाललीं पार वादळीं सुधी.

पैलतटिं न कां तृण मी झालें? तुडविता तरी पदीं !
पैलतटिं न कां कदंब फुललें? करिता माळा कधी.

पापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्रावीणें वधी.
प्राणाचें घे मोल नाविका, लावि पार, ने अधी !

कळा ज्या लागल्या जीवा, मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचें? कुणाला काय सांगाव्या?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी.

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं? वळूं मागे? करूं मी काय रे देवा?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

कुणि कोडें माझें उकलिल कां?

हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरीं माझ्या उजळे;
नव रत्‍नें तूं तुज भूषविलें,
मन्मन खुललें आंतिल कां?

रहस्य शास्त्री कुणि कळविल कां?
कुणि कोडें माझें उकलिल कां?<

हृदयीं माझ्या गुलाब फुलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
कांटा माझ्या पायीं रुतला,
शूल तुझ्या उरिं कोमल कां?

माझ्या शिरिं ढग निळा डवरला,
तव नयनिं पाउस खळखळला,
शरच्चंद्र या हृदयिं उगवला,
प्रभा मुखिं तव शीतल कां?

मद्याचा मी प्यालों प्याला
प्रिये, तयाचा मद तुज आला;
जखडिलें कुणी दोन जिवांला
मंत्रबंधनी केवळ? कां?

रहस्य शास्त्री कुणि कळविल का?
कुणि कोडें माझें उकलिल कां?

घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडें फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं,
कां गुदमरशी आंतच कुढुनी?
रे ! मार भरारी जरा वरी.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेल जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?

मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं.

"तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-"
"ताई, आणखि कोणाला?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला?"
"वेड लागलें दादाला !"
"मला कुणाचें? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला?"
"दादा, सांगूं बाबांला?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसूं खुसूं, गालिं हसूं-"
"वरवर अपुले रुसूं रुसूं"
"चल निघ, येथे नको बसूं"
"घर तर माझें तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गम्‍मत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशीं"
"तर मग गट्टी कोणाशीं?"

नववधू प्रिया, मी बावरतें;
लाजतें, पुढे सरतें, फिरतें.

कळे मला तूं प्राणसखा जरि,
कळे तूंच आधार सुखा जरि,
तुजवांचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरतें.

मला येथला लागला लळा,
सासरिं निघतां दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडितां कसें मन चरचरतें !

जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळें
पळत निघावें तुजजवळ पळें-
परि काय करूं? उरिं भरभरतें.

चित्र तुझें घेऊनि उरावरि
हारतुरे घालितें परोपरि
छायेवरि संतोष खुळी करिं
तूं बोलावितां परि थरथरतें.

अता तूंच भयलाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरें घर तें !

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जातां राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी कीं न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचें काय जाय?

अशा जगास्तव काय कुढावें !
मोहिं कुणाच्या कां गुंतावें?
हरिदूता कां विन्मुख व्हावें?
कां जिरवुं नये शान्‍तींत काय?

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां !

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा.

उपकाराची कुणा आठवण?
'शितें तोंवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा !

असक्त परि तूं केलिस वणवण,
दिलेंस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिलें सानथोरपण
समदर्शी तूं खरा !

About

We are professional and reliable provider since we offer customers the most powerful and beautiful themes. Besides, we always catch the latest technology and adapt to follow world’s new trends to deliver the best themes to the market.